कासोदा पोलिसांची २४ तासांत धडाकेबाज कारवाई; जीवघेण्या हल्ल्यातील तिन्ही आरोपी जेरबंद

कासोदा पोलिसांची २४ तासांत धडाकेबाज कारवाई; जीवघेण्या हल्ल्यातील तिन्ही आरोपी जेरबंद

कासोदा (ता. एरंडोल) प्रतिनिधी 
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत हनुमंतखेडे बु. ता. एरंडोल येथे लग्नातील बँडची गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना कासोदा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

दिनांक २४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २:१० वाजेच्या सुमारास हनुमंतखेडे बु. येथील मराठी शाळेच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडला. फिर्यादी अरुण भिला पाटील (वय ४२, रा. चाळीसगाव) आणि आरोपी यांच्यात बँडची गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून वाद झाला. वाद वाढत जाऊन आरोपी १) महेश प्रकाश बेडसे (पाटील), २) गौरव विजय बहिरम (पाटील) यांनी फिर्यादीस मारहाण केली. तसेच आरोपी ३) संदिप धोंडू बेडसे (पाटील) याने हातातील चाकूने वार करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला.

घटनेवेळी साक्षीदार विनय विकास उर्फ भैय्यासाहेब पाटील (रा. चाळीसगाव) हे मध्यस्थी करण्यासाठी धावून आले असता त्यांनाही दुखापत करण्यात आली.

या प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 0030/2026 भा.न्या.सं-2023 चे कलम 109, 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

तांत्रिक आधार नसतानाही स.पो.नि. श्रीकांत पाटील यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय यंत्रणेच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून अवघ्या २४ तासांच्या आत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

पथकाचा समन्वय आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन

आरोपींच्या शोध मोहिमेत स.पो.नि. श्रीकांत पाटील, पो.उ.नि. धर्मराज पाटील, पो.हे.कॉ. नितीन पाटील, पो.हे.कॉ. नंदलाल परदेशी, पो.हे.कॉ. किरण गाडीलोहार, पो.ना. अकिल मुजावर, पो.कॉ. प्रशांत पगारे, योगेश पाटील, अक्षय देवरे, लहु हटकर तसेच होमगार्ड नितीन पवार यांनी सहभाग घेतला.

ही अटक मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

कासोदा पोलिसांच्या तात्काळ आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.