मालडुंगे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार लवकरच चव्हाट्यावर?; माहिती अधिकारातील माहिती रोखल्याचा आरोप
जुलै १७, २०२६
माहिती अधिकार अर्जाला प्रतिसाद नाही; ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांच्या निलंबनाची सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र निकम यांची मागणी
पनवेल | प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विकासकामे, कथित अनधिकृत फार्महाऊस बांधकामे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळविण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जालाही वेळेत उत्तर न दिल्याने ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही फार्महाऊस बांधकामांसाठी आवश्यक शासकीय परवानग्या नसतानाही ग्रामपंचायतीमार्फत आर्थिक व्यवहार करून विविध कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या दप्तरातील नमुना रजिस्टर क्रमांक १ ते ३३ तसेच इतर अभिलेखांमध्ये फेरफार किंवा अनियमितता झाल्याची शंका व्यक्त होत आहे.
याशिवाय, कथित अनधिकृत बांधकामांबाबत नोटिसा बजावून संबंधितांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आल्याची चर्चा फार्महाऊस मालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त होत आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र निकम यांनी ७ मे २०२६ रोजी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मालडुंगे ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, कायद्यानुसार निर्धारित मुदत संपल्यानंतरही संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यानंतर हितेंद्र निकम यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र कोलटक्के यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. या अपीलावर २९ जून २०२६ रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान हितेंद्र निकम उपस्थित होते, मात्र ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले.
सुनावणीनंतर सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र कोलटक्के यांनी संबंधित माहिती सात दिवसांच्या आत अर्जदारास उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मात्र, आदेशानंतरही माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप हितेंद्र निकम यांनी केला आहे.
माहितीचा अधिकार कायद्याचे पालन करण्यात कसूर केल्याचा आरोप करत ग्रामपंचायत अधिकारी विनोद मोरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी हितेंद्र निकम यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी झाल्यास मालडुंगे ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनेक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
> टीप : या वृत्तातील भ्रष्टाचार व अनियमिततेसंदर्भातील सर्व आरोप हे सामाजिक कार्यकर्ते हितेंद्र निकम व स्थानिकांनी केलेले असून, संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी किंवा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.