कासोद्यात प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते निंबोळ्यांच्या बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ
ऑगस्ट ०५, २०२६
ट्रीगार्डसाठी ₹१० हजारांची आर्थिक मदत; पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक पुढाकार
कासोदा | प्रतिनिधी (नुरुद्दीन मुल्लाजी): एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. सुमारे तीन क्विंटल निंबोळ्यांच्या बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ एरंडोल विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) मनीषकुमार गायकवाड यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ५) उत्साहात करण्यात आला. यावेळी ट्रीगार्डसाठी ₹१० हजारांची आर्थिक मदत देखील करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानंदा पाटील होत्या. व्यासपीठावर पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी बळवंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सरपंच पुरुषोत्तम चौधरी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, धिरेन कालरिया तसेच कृष्णपाल सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कासोदा–पारोळा मार्गावरील साईबाबा मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गेल्या उन्हाळ्यात सुमारे तीन क्विंटल निंबोळ्या खरेदी करून वाळवण्यात आल्या होत्या. परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर या निंबोळ्यांचे बीजारोपण सुरू करण्यात आले.
ही बीजारोपण मोहीम कासोदा येथून मालखेडा, आडगाव, अंतुर्ली आणि वनकोठा या चारही दिशांना जाणाऱ्या मार्गांवर सुमारे २० ते २५ किलोमीटर परिसरात राबविण्यात येत असून, भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धनाला चालना मिळणार आहे.
यावेळी संदीप पाटील, श्रीकांत पाटील, समाधान पाटील, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि महानंदा पाटील यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले.
गेल्या उन्हाळ्यात लावलेल्या रोपांना नियमित पाणी देऊन त्यांचे संवर्धन करणारे संदीप वाघ आणि प्रवीण पाटील यांचा प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालखेड्याचे सरपंच सचिन पाटील, सुरेश सूर्यवंशी, महेश पांडे, उमेश पाटील, गौरव पाटील, गोपाल पांडे, प्रितम पटेल, प्रल्हाद पाटील, प्रवीण पाटील, उमेश नवाल तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील आणि नागरिकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ह.भ.प. संजय जमादार यांनी तर आभार प्रदर्शन सूर्यकांत पाटील यांनी केले.