करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेले नऊजण पॉझिटिव्ह
मे १५, २०२०
करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेले नऊजण पॉझिटिव्ह
करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या ९ जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनाग्रस्त व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला जाणं हे एका कुटुंबातील ९ जणांना चांगलंच भोवलं आहे. कारण ९ जणांना करोनाची बाधा झाली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या नऊ जणांशिवाय आणखी दोघांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे उल्हासनगरमधली करोनाग्रस्तांची संख्या ९२ झाली आहे. धक्कादायक म्हणजे कॅम्प तीनमधील मृत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूनंतर करोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने मृतांची संख्या पाच झाली आहे.
याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मृतदेह ताब्यात घेताना करोना नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करणार असल्याचे लेखी देत त्यावर सह्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधी पत्र दिलं होतं.
मागच्या आठवड्यात उल्हासनगरच्या खन्ना कंपाउंड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा मध्यवर्ती रुग्णालयात मृत्यू झाला होता, दरम्यान हा करोना संदिग्ध रुग्ण असल्याने त्याचा मृतदेह रुग्णालयाने द्यायला नकार दिला होता. मात्र कोविड १९ च्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करणार असल्याचे नातेवाईकांनी लेखी लिहून दिले होते. मात्र नातेवाईकांनी मृताचे पार्थिव उघडले आणि अनेकांनी त्या मृतदेहाला स्पर्श करीत नियम पायदळी तुडवले. ही माहिती महापालिकेला कळताच ७० जणांना क्वारंटाइन करण्यात आलं. त्यातल्या ९ जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर दोघांना करोनाची लागण झाली आहे.