भोई समाजात जे काही असामान्य कार्यकर्त होऊन गेले त्यांची माहीती समाजाला व्हावी म्हणुन माहीतीस्तव हा लेख समाजापुढे सादर
मे २८, २०२०
भोई समाजात जे काही असामान्य कार्यकर्त होऊन गेले त्यांची माहीती समाजाला व्हावी म्हणुन माहीतीस्तव हा लेख समाजापुढे सादर करीत आहे
सामाजिक आदर्श(कोळे येथील अण्णा भोई: एक पुण्यस्मरण)
केरळ मध्ये संघ स्वयंसेवकांवर होणारे नित्य हल्ले आपल् याला नवीन नाहीत. पण एके काळी पश्चिम महाराष्ट्र पण याच अवस्थेतून गेला आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही व धाडसी विधानही ठरणार नाही. यात जेष्ठ स्वयंसेवकांना विचारल्यावर डोळ्यासमोर नावे येतात ती कोल्हापूर येथील बाल स्वयंसेवक चिमण अष्टेकर (मृत्यू १९४५) व कोळे येथील अण्णा भोई यांचे (मृत्यू १९६०).
संघामध्ये जातीपातींना स्थान नाही, संघ हा तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय.तरी पण सामान्यजनांच्या दृष्टीने अण्णा भोई हे जातीने भोई, व्यवसायाने गवंडी; एवढेच नव्हे तर एके काळी संघाचा कट्टर विरोधक असणारा. संघाची शाखा कोळे गावात लागू नये म्हणून मनापासून अथक प्रयत्न करणाऱ्यांमध्ये, ते एक प्रमुख तरुण होते. अण्णा भोई यांचे पूर्ण नाव अण्णा लिंबाजी फिरंगे त्यांना प्रेमाने घराचे लोक व स्वयंसेवक भाऊ म्हणत असत.
अण्णा भोई यांचे वडील लिंबाजी, व्यवसाय मासेमारी, कुटुंब भले मोठ्ठे, व्यापही मोठ्ठा, व्यवसायात बरकत नाही, म्हणजे गरिबी आलीच. सहावी सातवी पर्यंत शिक्षण संपवून अण्णांनी गवंडी काम पत्करले. दिवसभर गवंडी तर संध्याकाळी मासेमारी असा जीवनक्रम. अशात वेळ मिळाला की संघाला विरोध करण्याचे व्रत. विरोध धारधार, वाणी ओजस्वी नसली तरी प्रभावी. बोलणे अतिशय सरळ सोपे व ग्रामीण ढंगाचे. कोणतेही काम जीव ओतून करण्याचा अण्णांचा स्वभाव, अगदी संघाला विरोध करतानाही उठून दिसायचा. मग सर्वांबरोबर शाखेवर दगड मारणे, मैदानात घाण करणे, मानवी विष्ठ आणून टाकणेही व्हायचे अधूनमधून.
तत्कालीन जिल्हा प्रचारक नाना पालकर यांचे अशा तरुणावर लक्ष न गेले असते तर नवलच. नानाच्या संपर्कात हा बहुजन समाजातील तरुण तडफदार युवक संपर्कात आला व त्याला परीसस्पर्श लाभला संघाचा. नानांनी या तरुणाचे नेतृत्वगुण ओळखून या हिर्याला संघात आणले. अण्णांचे संघाबद्दलचे अनेक गैरसमज दूर झाल्यावर अण्णा कोळ्यातील दैनंदिन शाखेत यायला लागले.
सुरुवातीला संघविरोधक असलेले अण्णा, पुढील आयुष्यात संघाविस्ताराचाच ध्यास घेतलेले सर्वांचे भाऊ झाले. अण्णा म्हणजे अकृत्रिम प्रेम, अण्णा म्हणजे लोकसंग्रह करण्याचे कसब, अण्णा म्हणजे लोकांच्या सुखदु:खात समरस होणारे. अण्णा म्हणजे अखंड संघकार्य, अण्णा म्हणजे कर्तृत्व, अण्णा म्हणजे काय नाही हे लिहिणे अवघडच. ‘अण्णा म्हणजे सर्वकाही’ अशी भावना त्यावेळच्या स्वयंसेवकांच्या मनात असल्यास नवल नाही. असे असलेले अण्णा दिसायचे तरी कसे. दिसायला काळे-सावळे, सहा फुट उंची, सडपातळ बांधा, सैलसर पायघोळ नेहरू शर्ट, जाडे-भरडे धोतर, पायात धनगरी नालाची वहाण, कामावर जाताना हातात सायकल, सायकलवर गवंडी कामाची हत्यारे, सायकलला पुढे लावलेला जेवणाचा डबा व कामाला बरोबर येणाऱ्या सवंगड्यांचा ताफा. समर्थांच्या उक्तीनुसार ‘वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा’ अशी त्यांची वेशभूषा.
या तरुणाने संघविचार समजून घेतल्यावर, कोळे गावाजवळील पंचक्रोशी अथक प्रयत्नाने ढवळून काढली. शिंगणवाडी, कुसूर, ताउख, अणे, अंबवडे, घारेवाडी, पोतले, खळे ई गावात संघशाखा सुरु झाल्या. कोळे गावात ५५ साली संघाचा बॅन्ड – घोषपथक उभे केले. त्यांच्याच प्रयत्नाने कोळे गावात विविध संस्था उभ्या राहिल्या. आत्ता ज्याला संघाची अन्यान्य क्षेत्रे म्हणले जाते त्याचे प्रारूप अण्णांनी कोळ्यात उभे केले. गावात सामुहिक शेतीसाठी नांगर, त्राक्तर आणण्यात आला, आज किसन संघ भारतभर रुजलाय, पण बीजे दिसतात ती अण्णांच्या दृष्टीत. श्रमिक संघटना म्हणून मजूर सहकारी सोसायटी उभी राहिली, आजचा भारतिय मजदूर संघ असेच काम करतो. कला क्षेत्रातील कलाकार संघात यावेत यासाठी कलाविकास नाट्यमंडळ उभे केले. आज संस्कार भारती हेच काम करत आहे. स्वयंसेवकांच्या श्रमदानातून गावाचा रस्ता तयार केला. अगदी सहमतीचे राजकारण देखील केले ते सुद्धा मुस्लीम उमेदवाराच्या मद तीने. त्यावेळचे *सरसंघचालक पु गोळवलकर गुरुजींना देखील कोळे गावात प्रभात शाखेवर यायला लावले ते अण्णांनी*, २९ ऑगस्ट १९५७ रोजी. त्यांच्या प्रयत्नाने कोळे गावाचा परिसर संघमय झाला व हेच संघ विरोधकांना पचले नाही.
अण्णांवर सुरवातीच्या काळात सेवादलाचा, सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. *’संघ बामणांचा, मी नाही चालू देणार शाखा’ असे म्हणणारा हाच तरुण संघात पुढे जाऊन सातारा जिल्ह्याचा कार्यवाह बनतो, हीच संघाची किमया. हीच किमया कळण्यासाठी म्हणून संघशाखेचा अनुभव घेणे गरजेचे आहे*. नानाच्या परीसस्पर्शाने अण्णांचे जीवन संघमय झाले. रामदासजी कळसकरांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले, तर त्यावर कोंदण चढवले ते दत्तोपंत म्हसकरांनी. दत्तोपंतांनी अण्णांवर सातारा जिल्हा कार्यवाह अशी जबाबदारी दिले. उभ्या महाराष्ट्राला अण्णांच्या कर्तृत्वाचे दर्शन झाले. पण विरोधकांना नाही समजले अण्णांचे कर्तृत्व आणि भातृत्व. विरोधकांच्या बालबुद्धीने घात केला.
*१९६० सालचा तो दिवाळीचा अमावस्येचा दिवस, अण्णांसाठी काळरात्र ठरला. अण्णा परगावी निघाले होते. एवढ्यातत काही तरी शेतावर झाले आहे असा निरोप त्यांना मिळाला. अण्णा त्यांच्या शेतावर गेले व त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने खुनी हल्ला केला गेला व त्यातच त्यांना मृत्यू आला*. त्यांना कराडच्या कॉटेज हॉस्पिटलला आणले खरे पण आधीच ते देवाघरी गेले होते. अण्णांच्या मृत्यूनंतर त्यावेळचे कराडमधील प्रमुख कार्यकर्ते कै गजाभाऊ कोल्हटकर यांना *गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या पत्राचा आशय असा, “वैर धरून अण्णा काही परत येणार नाहीत. न्याय देवता आपले काम करील व गुन्हेगारांना शासन होईल.” गुरुजी पुन्हा कोळ्याला आले*. अण्णांच्या घरच्यांचे व इतर स्वयंसेवकांचे सांत्वन केले. कोळे गाव सावरले, संघ सावरला. पुनश्च हरी ओम म्हणत कोळ्यात संघकार्य सुरु झाले. कोळ्याचेच नारायणकाका कराळे, अण्णांच्या नंतर सातारा जिल्हा कार्यवाह झाले. अण्णा भोई खून खटल्याची केस प्रांतसंघचालक कै बाबाराव भिडे यांनी लढली. केसचा निकाल लागून दोषींना शिक्षाही झाली, पण अण्णांना संघ कायमचा मुकला. अण्णा परत आले ते असंख्य कार्यकर्त्यांच्या रूपाने अण्णा अमर झाले
कै नाना पालकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात
आज जगी या ठरलो वेडे
गातील सगळे उद्या पवाडे
देतील आमच्या धवल यशाचे
फडकावून निशाण
हे निशाण फडकण्यासाठी संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या योगदानात अण्णा भोइंचा प्रमुख वाटा कसा विसरता येईल बरे. संघ शाखेत एक गीत म्हणाले जाते, *‘पेटली जरी गुढी तरी हसायचे, संघकार्य ना कधी विरून जायचे’*. मन धजत नाही अण्णांच्या मागे कैलासवासी लावायला. राष्ट्र संवर्धन संस्था सातारच्या कराडशाखेने अण्णांच्या मृत्युपश्चात ५७ वर्षानंतर सार्वजनिक व्याख्यानमाला सुरु केली यासाठी राष्ट्र संवर्धन संस्थेचे मनापासून अभिनंदन.
लेखक -केदार संघगोत्री
संकलक - श्री गणेश सपकाळ -
