अनिल पगारे यांचा ‘युवा संकल्प महाराष्ट्र आदर्श समाजभूषण’ पुरस्काराने भव्य सन्मान

अनिल पगारे यांचा ‘युवा संकल्प महाराष्ट्र आदर्श समाजभूषण’ पुरस्काराने भव्य सन्मान

प्रतिनिधी (चाळीसगाव) – चाळीसगाव तालुक्यातील कृष्णनगर, तळेगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल पगारे यांना ‘युवा संकल्प महाराष्ट्र आदर्श समाजभूषण’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. युवा प्रबोधन साहित्य मंच पुणे यांच्या वतीने महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित भव्य समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.अनिल पगारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिव- फुले-शाहू -आंबेडकर यांचा विचाराने प्रेरित होऊन समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य करत शिक्षण, सामाजिक जनजागृती,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,शासकीय योजनांची माहिती व त्यांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान असून संविधान प्रचाराचे देखील कार्य सतत करत असतात विशेषतः युवकांना सकारात्मक दिशा देणे, सामाजिक ऐक्य निर्माण करणे आणि ग्रामीण भागात विकासाची जाणीव जागृत करण्यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     या सन्मान सोहळ्यास मा. सहआयुक्त विशाल लोंढे, उद्योजक संतोष वाकोडे, समाजसेवक संपत गारगोटे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, दत्ता कोहिणकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अनिल पगारे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समाजसेवेतील निष्ठा, जिद्द आणि नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले.
    पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना अनिल पगारे म्हणाले, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजबांधवांचा आहे. समाजातील वंचित, आदिवासी, दलित, महिला आणि युवकांच्या विकासासाठी मी सातत्याने कार्य करत राहणार आहे. शिक्षण, सामाजिक समता आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा असून भविष्यातही अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारा आहे.”
     या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या सन्मानामुळे अनिल पगारे यांच्या सामाजिक कार्याला नवी उभारी मिळणार असून भविष्यातही ते अधिक जोमाने समाजसेवा करत राहतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.सदर पुरस्कार मिळाल्याने त्याच्यावर विविध स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत असून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.