-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उत्रान (ता. एरंडोल) येथे पाटचारीच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उत्रान (ता. एरंडोल) येथे पाटचारीच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
उत्रान (ता. एरंडोल) परिसरातील शेतकऱ्यांना पाटचारीतून अचानक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मोठा फटका बसला आहे. जामदा-गिरणा कालव्याच्या पिंपरखेड येथून ई-4 पाटचारीत अनपेक्षितपणे पाणी आल्याने ते थेट शेतांमध्ये शिरले आणि यामुळे गुरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शेतकरी मनोज आनंदा महाजन यांनी आपल्या बैल व गायींसाठी दादर ज्वारीचा चारा शेतात साठवून ठेवला होता. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पाटचारीत पाणी सोडण्यात आल्याने हा सर्व चारा पाण्यात भिजून खराब झाला. त्यामुळे त्यांच्या पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीचे अतोनात नुकसान झाले आहे.

याशिवाय पाटचारीलगत असलेल्या पेरू व लिंबू या फळबागांनाही या पाण्याचा फटका बसला असून झाडांना पाणी साचल्याने नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घटनेनंतर शेतकऱ्यांनी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अचानक पाणी सोडण्यामागे नेमके कारण काय आणि या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

advertising articles 2

-->