तृतीयपंथीय व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चाळीसगाव येथे स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न
जून ०३, २०२६
चाळीसगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय जळगाव तसेच तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना जिल्हास्तरीय समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथे तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.शिबिरामध्ये समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांसह स्वयंरोजगार, व्यवसाय उभारणी, आर्थिक सहाय्य, कर्ज योजना, शासकीय दाखले, ओळखपत्रे आणि विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या शिबिराला विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये मा. अमोल कुलकर्णी (विशेष अधिकारी, समाजकल्याण जळगाव), प्रियंका पाटील (उद्योग निरीक्षक, उद्योग विभाग), गौरव पोखरना (विस्तार अधिकारी, पंचायत समिती चाळीसगाव), गणेश वाघमारे (तालुका व्यवस्थापक, उमेद अभियान), संदेश पाटील, विश्वजीत गिरासे (संजय गांधी निराधार योजना), संगीता जाधव (पंचायत समिती चाळीसगाव), वैभव चिमटे व नंदू राजपूत (पुरवठा विभाग) यांनी उपस्थित राहून तृतीयपंथीय बांधवांना विविध शासकीय योजना, स्वयंरोजगाराच्या संधी आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमास पाचोरा येथील सीमा जान (गुरू) तसेच चाळीसगाव येथील फिजा गुरू यांची विशेष उपस्थिती लाभली. चाळीसगाव, पाचोरा व परिसरातील मोठ्या संख्येने तृतीयपंथीय बांधवांनी या शिबिरात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली.
तृतीयपंथीय व्यक्तींना एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी तहसील कार्यालय (संजय गांधी निराधार व पुरवठा विभाग), कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र (DIC), विविध राष्ट्रीयीकृत बँका तसेच आर्थिक विकास महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी व्यवसायासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, उद्योग नोंदणी, कर्ज योजना, अनुदान, बीज भांडवल योजना आणि शासकीय लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.यावेळी समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक महेंद्र पाटील यांनी तृतीयपंथीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. योजनेचे उद्दिष्ट, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, आर्थिक सहाय्याचे स्वरूप तसेच व्यवसाय उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. तृतीयपंथीय बांधवांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
विशेषतः समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. तृतीयपंथीय बांधवांनी पारंपरिक रोजगाराच्या मर्यादेत न राहता स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. अमोल कुलकर्णी (विशेष अधिकारी, समाजकल्याण जळगाव) यांनी केले. त्यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश, तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकल्याण तथा बार्टी चे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सागर वीसे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व तृतीयपंथीय बांधवांचे आभार मानले.सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक चेतन चौधरी, महेंद्र कुमावत, दर्शन कुमावत, ज्ञानेश्वर लिंगायत,अर्जुन गायकवाड, स्नेहा बोरसे तसेच इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन, लाभार्थ्यांशी समन्वय, उपस्थित मान्यवरांचे स्वागत, नोंदणी व्यवस्था व शिबिराचे सुरळीत व्यवस्थापन यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.या शिबिरामुळे तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती, आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी आणि उद्योजकतेसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.