सहकारी तत्वावर चालणाऱ्या पेट्रोल पंपांची दयनीय अवस्था; शेतकरी सभासद अडचणीत

सहकारी तत्वावर चालणाऱ्या पेट्रोल पंपांची दयनीय अवस्था; शेतकरी सभासद अडचणीत

आडगाव ता. एरंडोल : शासनाने शेतकरी सभासदांच्या सोयीसाठी सहकारी संस्थांना पेट्रोल व डिझेल पंप सुरू करण्यास मंजुरी दिली होती. जळगाव जिल्ह्यात सहकार तत्वावर चालणारे सात पेट्रोल पंप कार्यरत असून त्यामध्ये निंबोरा फ्रुटसेल सहकारी संस्था, अंतुर्ली सहकारी संस्था, शेंदूर्णी जिनिंग सहकारी संस्था, शेंदूर्णी सहकारी संस्था, ऐनपूर सहकारी संस्था तसेच एरंडोल तालुक्यातील कै. आबासाहेब खंडेराव पाटील सहकारी संस्थेचा समावेश आहे.

या सर्व पंपांना शासनाने “कंझ्युमर पंप” म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी सहकारी तत्वावर चालणाऱ्या पंपांसाठी डिझेलच्या दरात तब्बल ३० रुपये तर पेट्रोलच्या दरात १८ रुपयांनी वाढ केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. रिटेल विक्रेत्यांच्या पंपांपेक्षा सहकारी पंपांवरील दर अधिक असल्यामुळे शेतकरी वर्ग संभ्रमात पडला असून संस्थांनाही हा व्यवहार परवडणारा राहिलेला नाही.

ऐन खरीप हंगामात पेट्रोल व डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकरी सभासदांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या पंपांना मान्यता दिली असताना वाढीव दरांमुळे अनेक संस्थांनी पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना डिझेल-पेट्रोल मिळविण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

शेतकरी सभासद मोठ्या विश्वासाने सहकारी संस्थांच्या पंपांवर इंधन खरेदीसाठी येतात, मात्र पंप बंद असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सहकारी संस्थांच्या पंपांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी सभासद व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

कॅप्शन : सहकारी तत्वावर चालणाऱ्या पंपांवरील इंधनाचे दर रिटेल पंपांपेक्षा जास्त असल्याने संस्थांना व शेतकरी सभासदांना ते परवडत नसून, निर्णय होईपर्यंत अनेक पंप बंद ठेवण्यात आले आहेत. संबंधित वरिष्ठांनी तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी.

— भगतसिंग शालीग्राम पाटील
चेअरमन, फ्रुटसेल सहकारी संस्था, कासोदा ता. एरंडोल