शासनाने रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात वाढत्या खतदरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात
मे २८, २०२६
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी आज शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. शेती व्यवसायावर अवलंबून असलेला शेतकरी दिवसरात्र कष्ट करूनही वर्षाअखेरीस कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाची सुरुवात होत असताना रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतींमुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. शासनाने तातडीने खतांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी कासोदा परिसरातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
शेतकरी मोठ्या मेहनतीने शेतीची मशागत करून पिकांची पेरणी करतो. मात्र शेतीमालाला हमीभाव नसल्याने त्याचे आर्थिक गणित कोलमडत आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाची चिंता कायम असते. अशातच बियाणे, डिझेल आणि रासायनिक खतांच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सध्या बाजारात खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून २०:२०:० खताची बॅग सुमारे १८०० रुपये, अमोनियम सल्फेट १४०० रुपये, १०:२६:२६ खत २१०० रुपये, १६:१६:१६ खत २०५० रुपये, १५:१५:१५ खत २०२५ रुपये तर २०:२०:१३ खत २००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सरासरी प्रत्येक खताच्या बॅगेमागे सुमारे ३०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
खतांच्या वाढत्या दरामुळे शेती कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांचा विचार करून रासायनिक खतांच्या किंमती कमी कराव्यात व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी
कै. आबासाहेब खंडेराव पाटील सहकारी फ्रुटसेल संस्थेचे संचालक तथा जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशनचे संचालक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केली आहे. परिसरातील शेतकरी बांधवांनीही या मागणीला समर्थन दिले आहे.