कडक उन्हामुळे लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे आवाहन - गोपाळ पाटील तहसीलदार एरंडोल
उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा दिलासादायक निर्णय उत्पन्नाचा दाखला आता थेट व्हॉट्सॲपवर पाठवा; डिजिटल हयाती प्रमाणपत्रासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत घ्या
एरंडोल | प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एरंडोल तहसील प्रशासनाने महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेचा विचार करून लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष येण्याऐवजी कागदपत्रे डिजिटल माध्यमातून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येथील नायब तहसीलदार अमोल बन यांनी सर्व लाभार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन करत सांगितले की, दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला सादर करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. वेळेत दाखला जमा न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचे मानधन बंद होण्याची शक्यता असते.
तसेच, ७ मे २०२४ च्या शासन निर्णयानुसार आता लाभार्थ्यांना ‘Beneficiary Satyapan App’ च्या माध्यमातून डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र (Digital Life Certificate) सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे.
व्हॉट्सॲपवरच जमा करा कागदपत्रे
उन्हाचा त्रास आणि वृद्ध लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थ्यांनी आपला उत्पन्नाचा दाखला मोबाईलवरून थेट 9545629288 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक स्तरावर मिळणार मदत
डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी लाभार्थी आपल्या गावातील सेतू केंद्र चालक, ग्रामसेवक, महसूल सेवक किंवा कोतवाल यांची मदत घेऊ शकतात. त्यामुळे तहसील कार्यालयात गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.
“वाढती उष्णता पाहता लाभार्थ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा स्थानिक प्रशासकीय कर्मचाऱ्यांमार्फत कागदपत्रे जमा करावीत.”
प्रशासनाचे आवाहन
सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करून आपले मानधन सुरळीत सुरू राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन
-गोपाळ पाटील तहसीलदार, एरंडोल
अमोल बन - नायब तहसीलदार एरंडोल यांनी केले आहे.