महावितरणचा निष्काळजीपणा पुन्हा उघड; जवखेडे सिम येथे शॉर्ट सर्किटमुळे BSF जवानाचे  ठिबक व चारा जळून खाक

महावितरणचा निष्काळजीपणा पुन्हा उघड; जवखेडे सिम येथे शॉर्ट सर्किटमुळे BSF जवानाचे ठिबक व चारा जळून खाक

लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान, ग्रामस्थांमध्ये संताप

जवखेडे सिम ता. एरंडोल :
महावितरणच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला असून, जवखेडे सिम येथे विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सीमा सुरक्षा दलात (BSF) कार्यरत असलेले जवान विजयकुमार भदाणे यांच्या शेतातील सुमारे तीन एकर क्षेत्रातील ठिबक सिंचन संच  व चारा जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार भदाणे यांच्या शेतावरून गेलेल्या वीज वाहिन्यांच्या तारा अनेक दिवसांपासून अत्यंत खाली झुकलेल्या अवस्थेत होत्या. रविवारी दुपारच्या सुमारास या तारांमध्ये अचानक जोरदार शॉर्ट सर्किट झाले. त्यातून निघालेल्या ठिणग्या थेट शेतात पडल्या. उन्हाचा तीव्र तडाखा आणि शेतातील कोरडा पालापाचोळा, चारा यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आग इतकी भीषण होती की, तीन एकर क्षेत्रात टाकण्यात आलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या, साहित्य आणि अन्य शेती साहित्य जळून पूर्णपणे नष्ट झाले.
विशेष बाब म्हणजे, ही घटना अचानक घडलेली नसून यापूर्वीही परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकरी समाधान बापू पाटील यांच्या शेतातही विजेच्या तारांमुळे आग लागून नुकसान झाले होते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात लेखी तक्रार देत लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी आज पुन्हा एका शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. विजयकुमार भदाणे हे सध्या देशसेवेसाठी सीमारेषेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर संताप व्यक्त केला.
> “देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाच्या शेतीचेही संरक्षण महावितरण करू शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. आता तरी प्रशासनाने जागे होऊन जबाबदारांवर कारवाई करावी,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी महावितरणकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतांमधून जाणाऱ्या धोकादायक आणि लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांची उंची वाढवून जुन्या तारांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.