-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अंतुर्ली–जवखेडे सिम रस्त्यावर जीवघेणा खड्डा; अपघाताची टांगती तलवार!

अंतुर्ली–जवखेडे सिम रस्त्यावर जीवघेणा खड्डा; अपघाताची टांगती तलवार!
जवखेडे सिम तालुका एरंडोल 
अंतुर्ली ते जवखेडे सिम तालुका एरंडोल मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचत असल्याने त्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा भरधाव येणाऱ्या वाहनांचा या खड्ड्यात अपघात होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र इतक्या कमी कालावधीत रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली का? असे सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

कासोदा हे परिसरातील मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने अंतुर्ली, जवखेडे सिम तसेच परिसरातील अनेक गावांमधून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक या मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे रस्त्यावरील हा खड्डा केवळ गैरसोयीचा विषय नसून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारा गंभीर प्रश्न बनला आहे.
खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने एखादे दुचाकी किंवा चारचाकी वाहन त्यात आदळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहण्यापेक्षा तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून खड्डा बुजवावा, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“अपघात होण्याची वाट पाहणार की प्रशासन आधीच जागे होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

advertising articles 2

-->