-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोद्यात चहा हॉटेल बंद; भाववाढीची चाहूल..?

कासोद्यात चहा हॉटेल बंद; भाववाढीची चाहूल..?
कासोदा / नुरुद्दीन मुल्लाजी
कासोदा शहरात आज सकाळपासून एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील सुमारे २० ते २५ चहा हॉटेल्स अचानक बंद असल्याने नेहमीप्रमाणे चहासाठी हॉटेलकडे जाणाऱ्या ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. नेहमीच्या हॉटेलमध्ये चहा मिळत नसल्याने ग्राहक दुसऱ्या हॉटेलकडे धाव घेत आहेत; मात्र तेथेही शटर बंद असल्याने अखेर अनेक ग्राहक दूध डेअरीमधून दूध घेऊन घरी जाऊन चहा बनवून आपली चहाची तलब भागवत आहेत.
हॉटेल्स अचानक बंद ठेवण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शहरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ आणि दुधाच्या वाढत्या किमतीमुळे चहाचा सध्याचा दर व्यावसायिकांना परवडत नसल्याची चर्चा आहे. काल साखरेचा दर ७२ रुपये किलो असताना आज तो ७५ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यातच दूध, गॅस, कप, पाणी, कामगारांचे वेतन आणि इतर खर्च वाढत असल्याने चहा विक्रेत्यांसमोरही आर्थिक गणिताचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सध्या पाच रुपयांत मिळणारा हाफ चहा हॉटेल व्यावसायिकांना परवडतो का, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉटेल चालकांची बैठक होऊन चहाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे. उद्यापासून हाफ चहा दहा रुपयांना मिळणार का, याबाबतही ग्राहकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम आहे.

मात्र, दरवाढ करायची असल्यास ग्राहकांवर त्याचा किती भार पडणार, याचाही विचार होणे गरजेचे आहे. चहाचा एक कप हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. त्यामुळे अचानक दरवाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

दुसरीकडे, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांची अडचणही दुर्लक्षित करता येणार नाही. कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असताना जुन्या दरात व्यवसाय करणे त्यांच्यासाठीही कठीण होत आहे.

म्हणूनच कासोद्यातील हॉटेल्स आज नेमकी कोणत्या कारणामुळे बंद आहेत, याबाबत संबंधित व्यावसायिकांनी ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे. दरवाढीचा निर्णय होणार असेल तर तो पारदर्शकपणे जाहीर करावा. कारण प्रश्न फक्त एका कप चहाचा नाही; तो ग्राहक आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजच्या आर्थिक संघर्षाचा आहे.

कासोद्यातील बंद शटरमागचे खरे कारण आणि उद्याचा चहाचा दर काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertising articles 2

-->