-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

राजाभाऊ मंत्री पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा उत्साहात

राजाभाऊ मंत्री पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा उत्साहात

३० लाख २४ हजार ९३० रुपयांचा विक्रमी नफा; सभासदांना १५ टक्के लाभांशासह १ हजार रुपये सभाभत्ता
प्रतिनिधी : नुरुद्दीन मुल्लाजी
कासोदा : येथील विश्वासार्ह आणि नावाजलेली राजाभाऊ मंत्री पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन किशोरभाऊ मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बालाजी मंदिर येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना यंदा संस्थेला तब्बल ३० लाख २४ हजार ९३० रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली.

संस्थेच्या उल्लेखनीय आर्थिक कामगिरीबद्दल सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. यंदा सभासदांना १ हजार रुपये वार्षिक सभाभत्ता देण्यासोबतच १५ टक्के प्रोरेटा पद्धतीने लाभांश देण्यात आला आहे. लाभांशाची रक्कम सभासदांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली असून, त्याचे वाटप १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे.

नर्मदा परिक्रमा करणाऱ्या सभासदांचा गौरव

सभेत पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे संस्थेचे सभासद भालचंद्र ताराचंद शिंपी, मधुकर जगन्नाथ चिंचोले आणि श्रीमती जनाबाई पद्माकर पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या धार्मिक व प्रेरणादायी कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

तसेच वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सारंग सचिन मंडोरे आणि हिमांशू शैलेश बियाणी यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नशामुक्तीचा संदेश; सभासदांनी घेतली शपथ

समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने ब्रह्मकुमारी वर्षा व मीनाक्षी बेन यांनी सभेस उपस्थित सर्व सभासदांना नशामुक्तीची शपथ दिली. व्यसनापासून दूर राहून निरोगी व सक्षम समाज निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

सहकार क्षेत्राबाबत मार्गदर्शन

सहकार प्रशिक्षण केंद्राचे के. सी. बाविस्कर यांनी सभासदांना सहकार क्षेत्राची भूमिका, संस्थेचे कामकाज तसेच सभासदांच्या हक्क व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या कामकाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच सुधारित आदर्श उपविधी स्वीकारण्यास सभेने मंजुरी दिली.

संस्थेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहावा, यासाठी संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांच्या एकजुटीचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

सभेच्या समारोपप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक संजीव नवाल यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले. सभासदांनी संस्थेवर आजवर दाखविलेला विश्वास भविष्यातही कायम ठेवावा, संस्थेच्या पारदर्शक व विश्वासार्ह कारभाराला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी संस्थेच्या वतीने दिली.

advertising articles 2

-->