वारसा जपूया, इतिहास समजूया!’ विद्यार्थ्यांनी घेतला बेलेश्वर मंदिर स्वच्छतेचा वसा
सप्टेंबर ०५, २०२६
मेहरूण : विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी, तसेच ऐतिहासिक वास्तू व वस्तूंच्या जतन-संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांच्या वतीने श्रावण सहलीनिमित्त बेलेश्वर महादेव मंदिर परिसरात वारसा संवर्धन व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मंदिर परिसराची स्वच्छता केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिरातील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक परंपरा तसेच परिसरातील सांस्कृतिक वारशाचे महत्त्व जाणून घेतले. ऐतिहासिक वास्तू व वस्तूंचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगण्यात आले.
‘आपला इतिहास–आपला वारसा–आपली जबाबदारी’ या संदेशातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा आणि वारसा संवर्धनाचे महत्त्व अनुभवले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सहकार्याची भावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला.