नैनीतालच्या आंतरराष्ट्रीय गणेश मूर्ती प्रदर्शनात चोपड्याच्या काव्यंजली पाटीलची निवड
सप्टेंबर २२, २०२६
चोपडा : येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. काव्यंजली अनिलराज पाटील हिने आपल्या कलागुणांची अनोखी छाप उमटवत उत्तराखंडमधील नैनीताल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून सहभागी होणारी काव्यंजली ही एकमेव बाल मूर्तिकार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील नैनीताल येथील ‘मिट्टी से रंग तक सांस्कृतिक’ संस्थेच्या माध्यमातून २०२६ च्या गणेशोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर चार गटांमध्ये श्री गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विविध राज्यांसह देश-विदेशातील शालेय विद्यार्थी व कलावंत आपल्या कलाकृती सादर करीत आहेत. या प्रदर्शनासाठी काव्यंजली पाटील हिने स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून साकारलेली आकर्षक गणेशमूर्ती सादर केली आहे.
काव्यंजलीला लहानपणापासूनच माती कामाची विशेष आवड असून ती आपल्या वडिलांना गणेशमूर्ती रंगविण्यासाठीही मदत करते. अभ्यासासोबतच ती घरी मातीपासून विविध प्रकारची सुंदर भांडी व कलाकृती तयार करते. तिच्या या कलागुणांना तिच्या आईचे सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे. यापूर्वीही काव्यंजलीने चित्रकलेच्या क्षेत्रात पुरस्कार मिळवून आपल्या कलेची दखल मिळवली आहे.
‘मिट्टी से रंग तक’ संस्थेच्या फाऊंडर व अध्यक्षा चित्रकार डॉ. पूनम तसेच निवड समितीने काव्यंजलीच्या गणेशमूर्तीची निवड करून तिचे अभिनंदन केले असून पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या मूर्ती प्रदर्शनाला २६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
काव्यंजलीच्या या यशाबद्दल तिच्या वर्गशिक्षिका वैद्य मॅडम यांनीही तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काव्यंजली ही न्यूरोलॉजिस्ट डॉ. हेमराज पाटील यांची पुतणी आहे.
अल्पवयातच मातीशिल्प व चित्रकलेची आवड जोपासत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात स्थान मिळवणाऱ्या काव्यंजली पाटीलच्या या यशाचे चोपडा शहरातून कौतुक होत आहे.