-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चंदू अण्णा नगर–खोटेनगर रस्ता दुरुस्त करा; प्रभाग ९ मधील नागरिकांचे पालकमंत्र्यांकडे साकडे

चंदू अण्णा नगर–खोटेनगर रस्ता दुरुस्त करा; प्रभाग ९ मधील नागरिकांचे पालकमंत्र्यांकडे साकडे
हजारो नागरिकांचा दररोजचा प्रवास; पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था, तातडीने दुरुस्तीची मागणी

जळगाव : प्रभाग क्रमांक ९ मधील चंदू अण्णा नगर ते खोटेनगर या महत्त्वाच्या रस्त्याची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी पालकमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील हे पद्मालय येथील शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असताना त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ९ चे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा चंदू अण्णा नगर ते खोटेनगर हा मार्ग सध्या खड्डे, चिखल आणि खराब रस्त्यामुळे अत्यंत त्रासदायक बनला आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावरील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरात तालुका पोलीस स्टेशन, तलाठी व महसूल कार्यालय, कचरा फॅक्टरी तसेच मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा संपर्कमार्ग असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते.

यावेळी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी नवलसिंग राजे पाटील यांच्याशी संवाद साधत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची सविस्तर माहिती दिली. तसेच रस्त्याच्या सद्यस्थितीचे फोटो व व्हिडिओही त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चंदू अण्णा नगर ते खोटेनगर रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रहाची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पावसाळ्यात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत असल्याने प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

advertising articles 2

-->