-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा परिसरातील चालू कामांमधील भ्रष्टाचाराची नावानिशी पोलखोली जनतेसमोर आणण्याचा इशारा..!

रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा परिसरातील चालू कामांमधील भ्रष्टाचाराची नावानिशी पोलखोली जनतेसमोर आणण्याचा इशारा..!

(अंतुर्ली -जवखेडे सिम रस्त्यादरम्यान पडलेले धोकादायक खड्ड्यांचे छायाचित्र)

अंतुर्ली तालुका एरंडोल प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली आणि जवखेडे सिम सीमेदरम्यानच्या रस्त्यावर अतिशय धोकादायक खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पंधरा दिवसांपूर्वीच बातमीच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र, अद्यापही या गंभीर समस्येची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. आधीच खोल असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावर मोठा भीषण अपघात होण्याची शक्यता असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे या परिसरात विविध विकासकामे होताना दिसत आहेत. काही ठिकाणी गरज नसतानाही रस्त्यांवर मोऱ्यांची कामे केली जात असल्याचे चित्र आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असलेल्या या धोकादायक रस्त्याकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष का जात नाही, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
डोक्यात घातल्याप्रमाणे केला जाणारा विकास नागरिकांच्या काय उपयोगाचा? असा संतप्त सवालही आता परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ नवीन विकासकामे दाखवण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांची सुरक्षितता याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अंतुर्ली–जवखेडे सीम रस्त्यावरील खड्ड्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अन्यथा परिसरासह तालुक्यातील संशयास्पद व भ्रष्ट कामांचा नावानिशी पर्दाफाश नागरिकांसमोर करण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. आणखी एखादी दुर्घटना होण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

📢 अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत रहा आणि फॉलो करा 'प्रजा न्यूज महाराष्ट्र'!
तुमच्या भागात काही समस्या, भ्रष्टाचार किंवा अन्यायाविरुद्ध तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधा:
📞 संपर्क क्रमांक: 7709 91 84 69

(अंतुर्ली -जवखेडे सिम रस्त्यादरम्यान पडलेले धोकादायक खड्ड्यांचे छायाचित्र)

advertising articles 2

-->