-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

मातीशी नातं, बैलांशी ऋणानुबंध; शेतकऱ्याच्या जिवाभावाच्या सवंगड्यांचा आज बैलपोळा

मातीशी नातं, बैलांशी ऋणानुबंध; शेतकऱ्याच्या जिवाभावाच्या सवंगड्यांचा आज बैलपोळा
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शेती आणि बैल यांचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. शेतकऱ्याच्या कष्टाला खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. वर्षभर शेताच्या मातीत राबणाऱ्या या मुक्या जीवांना एका दिवसासाठी कामातून विश्रांती देऊन त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांच्या कष्टांचा सन्मान केला जातो आणि शेतकरी-बैल यांच्यातील अतूट नात्याला पुन्हा एकदा उजाळा मिळतो.

शेतीच्या कामात पूर्वी बैलांना अनन्यसाधारण महत्त्व होते. नांगरणीपासून पेरणीपर्यंत आणि शेतीतील अनेक कामांमध्ये बैल शेतकऱ्याचे खरे साथीदार होते. काळ बदलला, शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्री आली; मात्र ग्रामीण भागात बैलांप्रती असलेली श्रद्धा आणि आपुलकी आजही कायम आहे. त्यामुळे बैलपोळा हा केवळ धार्मिक सण न राहता शेतकऱ्याच्या श्रमजीवनाशी जोडलेला भावनिक उत्सव बनला आहे.

बैलपोळ्याच्या आदल्या दिवसापासूनच गावागावांत तयारीला सुरुवात होते. बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य आणले जाते. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना नदी, ओढा, विहीर किंवा उपलब्ध पाण्याच्या ठिकाणी नेऊन स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यानंतर घराच्या अंगणात त्यांना सजवण्याची लगबग सुरू होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात.

बैलांच्या शिंगांना विविध रंग लावले जातात. शिंगांवर बेगड लावून त्यांना आकर्षक रूप दिले जाते. शिंगांच्या टोकाला गोंडे बांधले जातात. गळ्यात घुंगुरमाळा, कवड्यांच्या माळा आणि रंगीबेरंगी दोऱ्या घातल्या जातात. डोक्याला बाशिंग, नवीन वेसण आणि अंगावर नक्षीदार झूल चढवली जाते. पायात तोडे घातले जातात. काही ठिकाणी बैलांच्या अंगावर विविध रंगांनी सुंदर नक्षीही काढली जाते.

पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणतेही काम लावले जात नाही. त्यांना मारले किंवा रागावले जात नाही. उलट त्यांची प्रेमाने सेवा केली जाते. त्यांच्या खांद्यावर जिथे जू ठेवले जाते, त्या ठिकाणी हळद, तूप किंवा तेलाने चोळण्याची प्रथा आहे. वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांच्या श्रमांना या माध्यमातून मानाचा मुजरा केला जातो.

बैलांसोबतच घरातील गाय, म्हैस, वासरू आणि इतर पशुधनालाही या दिवशी सजवून त्यांची पूजा केली जाते. घरातील महिला बैलांची आरती ओवाळतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि बैलांना गोडधोड खाऊ घातले जाते. शेतकऱ्याच्या घरातील पशुधन हे केवळ उपजीविकेचे साधन नसून कुटुंबाचा एक भाग असल्याची भावना या परंपरेतून दिसून येते.

दुपारनंतर अनेक गावांमध्ये सजलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढली जाते. गावातील मानाची बैलजोडी पुढे असते. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत ही मिरवणूक गावातून फिरते. आपल्या बैलजोडीला सर्वात सुंदर सजवण्याची चढाओढ शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. लहान मुले आणि तरुण ढोल-ताशांच्या तालावर नाचत या उत्सवात सहभागी होतात.

बैलपोळा म्हणजे शेतकरी आणि त्याच्या बैलामधील विश्वास, प्रेम आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. काळ्या मातीत घाम गाळून शेतकऱ्याच्या संसाराला आधार देणाऱ्या या मुक्या जीवांप्रती वर्षातून एकदा का होईना, मनापासून ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

आज शेती आधुनिक झाली असली, तरी शेतकऱ्याच्या मनातील बैलाचे स्थान कमी झालेले नाही. मातीत राबणारा बैल आणि त्या मातीतून अन्नधान्य पिकवणारा शेतकरी यांच्या नात्याचा सन्मान करणारा बैलपोळा म्हणूनच आजही ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक जिवंत आणि भावनिक सण ठरतो.

- प्रतिक जाधव (संपादक प्रजान्यूज महाराष्ट्र )

advertising articles 2

-->