पंचनामे शेतकऱ्यांचे, पण भूमिहीन शेतमजुरांच्या रोजगाराचे काय..?
ऑक्टोबर ०४, २०२६
दुष्काळात काम बंद; शेतमजुरांसाठी विशेष मदत व रोजगाराची मागणी एरंडोल, प्रतिनिधी : प्रविण बाविस्कर — एरंडोल तालुक्यात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिके करपून गेली असून, राज्य सरकारने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. पीक नुकसानभरपाई, वीजबिल सवलत, कर्जविषयक सवलती तसेच पाणी व चाऱ्याच्या उपाययोजना करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या मदतीचा केंद्रबिंदू प्रामुख्याने जमीनधारक शेतकरी असून, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही अशा भूमिहीन शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याने शेतातील कामे कमी झाली आहेत. परिणामी रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसून ते दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करतात. काही जण ठोक्याने शेती घेऊन कष्ट करतात, तर अनेक कुटुंबे रोजच्या मजुरीवर अवलंबून आहेत. दुष्काळामुळे शेतीची कामे ठप्प झाल्याने या कुटुंबांसमोर अन्नधान्य, मुलांचे शिक्षण, आरोग्यखर्च आणि कर्जफेडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ शेतजमिनींचे पंचनामे करून थांबू नये, तर भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण कामगारांसाठीही विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एरंडोल तालुका प्रमुख तथा उपविभागीय दक्षता संनियंत्रण समिती सदस्य प्रविण बाविस्कर यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त भूमिहीन शेतमजुरांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अन्नधान्याची विशेष व्यवस्था करावी तसेच मनरेगा आणि जलसंधारणाच्या कामांची व्याप्ती वाढवून गावपातळीवर त्वरित रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “पिकांचे पंचनामे होत आहेत; मात्र ज्यांचे जीवनच त्या पिकांवरील मजुरीवर अवलंबून आहे, त्यांच्या रोजगाराचा पंचनामा कोण करणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.