धाडसी अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांनी गॅस गळती विझवून २५ चिमुकल्यांचे प्राण वाचवले; पोलिसांकडून सन्मान
मार्च ०८, २०२६
उत्राण (ता. एरंडोल) : येथील अंगणवाडीमध्ये मोठा अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई दिलीप ठाकरे यांनी धाडस व प्रसंगावधान दाखवत २५ चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक तयार करत असताना एलपीजी गॅस सिलेंडरची नळी अचानक लिक झाली व त्याला पेट लागण्याची स्थिती निर्माण झाली. त्या वेळी अंगणवाडीमध्ये लहान मुले उपस्थित होती. परिस्थिती अत्यंत गंभीर असताना अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ धाडसाने पुढाकार घेत गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले आणि पेट घेणारी आग विझवली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि अंगणवाडीतील सुमारे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.
या धाडसी कृतीबद्दल कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने रंजनाबाई ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड, कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील तसेच पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
दरम्यान, या शौर्यपूर्ण कार्याबद्दल आमदार अमोल दादा पाटील यांनीही रंजनाबाई ठाकरे यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या धाडसाचे अभिनंदन केले आहे.
रंजनाबाई ठाकरे यांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला असून परिसरातून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.