-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

सुनील दैवे मृत्यू प्रकरण : संताप उसळला; आरोपींवर कठोर कारवाईची एकमुखी मागणी

सुनील दैवे मृत्यू प्रकरण : संताप उसळला; आरोपींवर कठोर कारवाईची एकमुखी मागणी
बोदवड प्रतिनिधी: शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उफाळलेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या सुनील शामराव दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बोदवड शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक घटकांकडून जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साध्या वादातून सुरू झालेल्या या घटनेने अचानक हिंसक वळण घेतले. आरोपींकडून झालेल्या बेदम मारहाणीमध्ये सुनील दैवे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच शहरभर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज सकाळी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला.

यानंतर सुनील दैवे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

advertising articles 2

-->