संगमनेर प्रकरणी संताप : फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीची मागणी, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मार्च २५, २०२६
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा तसेच ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला तातडीने न्याय मिळावा, यासाठी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात संबंधित आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात घेऊन लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशीही ठाम मागणी करण्यात आली.
यासोबतच पीडित कुटुंबाला शासनामार्फत आवश्यक संरक्षण व आर्थिक-सामाजिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून, दोषींना कडक शिक्षा होणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, महिला मंडळ अध्यक्ष तथा नगरसेविका रंजनाताई वानखेडे, बापू रणधीर, जितेंद्र देवरे, राजेश सोनार, सुभाष सोनार, सुरेश सोनार, रवींद्र दुसाने, पंकज विसपुते, प्रशांत विसपुते, जितेंद्र भालेराव, मनोज अहिरराव, पंकज रणधीर, इच्छाराम दाभाडे, विनोद सोनार, विनोद विसपुते, रत्नाकर दुसाने, बबलू बाविस्कर, भगवान दुसाने, विजय बागुल यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र मीडिया प्रदेश अध्यक्ष सुनील सोनार, नयनाताई वानखेडे, रमेश विसपुते, अमोल सोनार, नरेंद्र सोनार, ईश्वर दुसाने आदींनीही या निवेदनाला पाठिंबा दर्शविला.