-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जळगाव जिल्ह्यात मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न

जळगाव जिल्ह्यात मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भैय्यासाहेब गंधे सभागृह, जळगाव येथे मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण या होत्या.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे. के. पाटील, जिल्हा उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, वेतन विभाग अधीक्षक दिलीप पवार, उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत गवळी यांनी संचमान्यता संदर्भातील माहिती अचूकपणे भरून ती केंद्रस्तरापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व विशद केले. रागिणी चव्हाण यांनी शालेय कामकाजाचे दप्तर अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष डॉ. आर. डी. निकम यांनी शालेय स्तरावरील विविध समित्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

वेतन अधीक्षक दिलीप पवार यांनी वेतनाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती देत वेळेवर वेतन मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत आश्वस्त केले. महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक जे. के. पाटील यांनी मुख्याध्यापकांनी शालेय प्रशासनात सतर्क राहून नियमांनुसार कामकाज करावे तसेच शालेय दप्तराचा लेखाजोखा अद्ययावत ठेवावा, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, शालेय प्रशासन, विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, निपुण महाराष्ट्र अभियान, स्पर्धा परीक्षा व टीईटी परीक्षा यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. तसेच शालेय कामकाज नियमबद्ध आणि पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी गांधी तीर्थ, जैन हिल्स येथील कुळकर्णी यांनी गांधी रिसर्च परीक्षा संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रागिणी चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष एस. एस. पाटील, सचिव आर. ए. पाटील, उपाध्यक्ष ललित चौधरी, साधना लोखंडे आदींनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन संघाचे सचिव आर. ए. पाटील यांनी केले.
सभेला जिल्हाभरातील मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

advertising articles 2

-->