कासोद्यात दिवसाढवळ्या चोरीचा थरार! सेंट्रल बँकेतून काढलेले ₹47,630 अज्ञात चोरट्याने केले लंपास
जुलै २१, २०२६
कासोदा शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेंट्रल बँक शाखेतून काढलेली ₹47,630 ची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने क्षणार्धात लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. 21 जुलै 2026) सकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई बाबूलाल देवरे (वय 50), रा.सोनबर्डी ता. एरंडोल यांनी कासोदा येथील सेंट्रल बँक शाखेतून ₹47,630 इतकी रोख रक्कम काढली. पैसे पिशवीत ठेवून त्या कासोदा येथील चेतन इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर थांबल्या होत्या.
सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान त्या साडी स्वच्छ करत असताना त्यांनी पैशांची पिशवी दुकानासमोरील बाकड्यावर ठेवली. याच क्षणाची संधी साधत अज्ञात चोरट्याने पिशवी उचलली आणि घटनास्थळावरून फरार झाला. काही क्षणांनी पिशवी दिसत नसल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरात शोधाशोध केली; मात्र पिशवीचा मागमूस लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, तसेच अपरिचित व्यक्तींवर लक्ष ठेवून रोख रक्कम सुरक्षितरीत्या हाताळावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.