स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त चाळीसगावात अभिवादन कार्यक्रम संपन्न
जुलै २२, २०२६
चाळीसगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासकीय विश्रामगृह कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राने जनतेच्या हितासाठी अखंड झटणारा, दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावला. मात्र त्यांच्या विकासाभिमुख विचारांचा, जनहिताच्या धोरणांचा आणि कार्याचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे. प्रशासनावरील त्यांची भक्कम पकड, निर्णयक्षमता आणि लोकाभिमुख कार्यशैली भावी पिढ्यांसाठी आदर्श असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा शासकीय अधिकृत कार्यक्रमांमध्ये समावेश करून त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. राज्यातील शैक्षणिक व शासकीय संस्थांमध्ये त्यांच्या विचारांचा वारसा जपला जावा, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शशिकांत साळुंखे, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, प्रदेश युवक उपाध्यक्ष तथा नगरसेवक अभिषेक दादा देशमुख, तालुकाध्यक्ष दिनेशभाऊ पाटील, शहराध्यक्ष शामभाऊ देशमुख, शहर कार्याध्यक्ष योगेश राजधर पाटील, प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दिनकर पाटील, तालुका कार्याध्यक्ष नितीन भामरे, जिल्हा कार्याध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) किशोरभाऊ जाधव, तालुकाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) खुशाल मोरे, महिला तालुकाध्यक्ष सोनालीताई देऊळकर, युवती जिल्हा कार्याध्यक्ष स्वातीताई राजपूत, महिला जिल्हा उपाध्यक्षा सोनालीताई गुरव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य (विद्यार्थी) प्रणव उर्फ बिट्टू अहिरे, युवक तालुकाध्यक्ष करण पाटील, जितेंद्रभाऊ पाटील, रवींद्रभाऊ पाटील, प्रतापभाऊ भोसले, सागरभाऊ पाटील, स्वप्नीलभाऊ पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दिनकर पाटील यांनी केले.