-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

खड्डा दिसतोय, धोका दिसतोय; तरीही प्रशासन ‘झोपेत’! अंतुर्ली–जवखेडे सिम रस्त्यावरील जीवघेणा खड्डा जैसे थे

खड्डा दिसतोय, धोका दिसतोय; तरीही प्रशासन ‘झोपेत’! अंतुर्ली–जवखेडे सिम रस्त्यावरील जीवघेणा खड्डा जैसे थे
कासोदा : अंतुर्ली–जवखेडे सिम रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याची बातमी प्रसिद्ध होऊनही संबंधित प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कानावर जणू काही त्याचा आवाजच पोहोचलेला नाही. खड्डा तसाच, धोका तसाच आणि प्रशासनाची उदासीनताही तशीच! त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने तो वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नाही. अशा परिस्थितीत दुचाकीस्वाराचा तोल जाणे, वाहन खड्ड्यात आदळणे किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविताना अपघात होणे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्घटना घडण्याची शक्यता स्पष्ट दिसत असताना प्रशासन नेमके कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे?

अपघात झाला तरच जाग येणार का?

या मार्गावरून कासोदा बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या अनेक गावांतील नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा खड्डा केवळ रस्त्याची खराब अवस्था नसून नागरिकांच्या जीवाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. तरीही स्थानिक नेते आणि संबंधित अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, रस्त्याचे काम अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी झाले असल्याचे सांगितले जात असताना आज रस्त्याची अशी अवस्था का झाली? कामाचा दर्जा तपासला होता की केवळ कागदावरच काम पूर्ण दाखवण्यात आले? ठेकेदाराची जबाबदारी निश्चित झाली का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष?

नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवाज उठवण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. नागरिकांचा जीव धोक्यात असताना नेतेमंडळी आणि अधिकारी नेमके कुठे आहेत? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

फोटो आणि बातमीच्या माध्यमातून समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रत्यक्ष ठिकाणी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसेल, तर प्रशासनाला जागे करण्यासाठी आणखी किती पुरावे आणि किती इशारे द्यावे लागणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

दुर्घटना होण्याआधी कारवाई करा!

संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून खड्डा बुजवावा, रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि मागील कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी. तसेच दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“आज खड्डा आहे, उद्या अपघात होऊ शकतो आणि परवा एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. त्यानंतर प्रशासन जागे होऊन काय उपयोग?”

मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी जागे होऊन हा जीवघेणा खड्डा बुजवावा, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा दुर्घटना घडल्यास जबाबदारी निश्चित कोणाची, हा प्रश्न प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना नागरिकांकडून विचारला जाणार आहे.

advertising articles 2

-->