पानांमधून साकारला बाप्पा; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला निसर्गाची साथ
सप्टेंबर १९, २०२६
जळगाव : शिक्षण हे केवळ पुस्तकातील धडे आणि वर्गातील अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना वाव देणारे असावे, याचा सुंदर अनुभव मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिरात पाहायला मिळाला. ‘विना दप्तराची शाळा’ या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या पानांचा कलात्मक वापर करून गणपतीच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या.
पिंपळ, जास्वंद, अशोक यांसह विविध झाडांची पाने गोळा करून विद्यार्थ्यांनी त्यांची रचना आणि आकार यांचा कल्पकतेने वापर करत गणपतीच्या प्रतिकृती तयार केल्या. निसर्गातून मिळणाऱ्या साहित्याचा उपयोग करून कलाकृती साकारण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाची ओळख होतानाच त्यांच्यातील कलात्मक दृष्टी आणि सर्जनशीलतेलाही चालना मिळाली.
या अभिनव उपक्रमाचे प्रात्यक्षिक उपक्रमशील कलाशिक्षक व निसर्गप्रेमी सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखविले. पानांची निवड, त्यांची मांडणी, आकार आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा कलात्मक वापर याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध सुंदर कलाकृती साकारल्या.
दरम्यान, ‘विना दप्तराची शाळा’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी खेळ, गाणी, गोष्टी तसेच विविध मनोरंजक शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले. दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त अशा आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिकण्याची आणि स्वतःमधील कलागुण व्यक्त करण्याची संधी मिळाली. खेळातून सहकार्याची भावना, गाण्यांतून आनंद, गोष्टींतून मूल्यशिक्षण आणि कलाकृतीच्या माध्यमातून सर्जनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणपतीच्या कलाकृतींचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका अलका महाजन, मिरा चौधरी, वैशाली साळुंके आणि मनोजकुमार बावस्कर यांनी कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनीही कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.