कासोदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांचा सत्कार; सेवाकाळातील कार्याचा गौरव
सप्टेंबर १९, २०२६
कासोदा, ता. एरंडोल : कासोदा पोलीस स्टेशन येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी परिसरातील पोलीस पाटलांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुरलीधर धर्मागीर गोसावी (जवखेडे सिम), राजेंद्र पाटील (उत्राण गु.ह.), अजाबराव पाटील (नांदखुर्दे) आणि मोतीलाल पाटील (हनुमंतखेडे बु.) यांचा सत्कार करण्यात आला.
यातील काही पोलीस पाटील सेवानिवृत्त होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला असतानाही, त्यांच्या सेवाकाळातील योगदानाची दखल घेत कासोदा पोलीस स्टेशन व आजी-माजी पोलीस पाटील यांच्या वतीने त्यांचा आवर्जून सत्कार करण्यात आला.
यावेळी मुरलीधर धर्मागीर गोसावी यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या पोलीस पाटील पदाच्या कार्यकाळातील आठवणी सांगितल्या. जवखेडे सिम येथे त्यांच्या पुढाकाराने तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने गेल्या २० वर्षांपासून गावात दारूबंदी कायम आहे. पोलीस पाटील म्हणून कार्यरत असताना गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी त्यांनी पूर्णपणे झोकून देऊन काम केले, असे त्यांनी मनोगतात सांगितले.
कार्यक्रमास कासोदा पोलीस स्टेशनचे API श्रीकांत पाटील, PSI धर्मराज पाटील, PSI भावसार मॅडम, PSI रामकृष्ण पाटील आणि PSI नितीन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील आजी-माजी पोलीस पाटील उपस्थित होते. सेवानिवृत्तीनंतरही पोलीस पाटलांच्या सेवाकाळातील कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.