पर्यावरण रक्षणासाठी मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात नाविन्यपूर्ण ‘सीड्स बॉल’ उपक्रम राबवला

जळगाव (प्रतिनिधी):
मानव सेवा मंडळ संचलित मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. ‘सीड्स बॉल’ (बीज गोळे) तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे नेतृत्व उपक्रमशील शिक्षक, चित्रकार आणि इको क्लब प्रमुख श्री. सुनिल दाभाडे यांनी केले.

या कार्यशाळेत माती व शेणखत यांचे समप्रमाणात मिश्रण करून पीठासारखे मळून घेतले गेले. त्यानंतर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करून त्यात विविध फळझाडांच्या बिया भरल्या गेल्या. विद्यार्थ्यांच्या हस्ते तयार झालेल्या या ‘सीड्स बॉल’ना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने डोंगराळ भागात, नदीकिनारी आणि रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आले.
मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे महत्व पटवून देत सांगितले की, "शालेय जीवनातच जर पर्यावरणाचे भान आले, तर भावी पिढी सक्षम आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारी घडेल."
यावेळी विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" तसेच "जळगाव सिटी स्मार्ट सिटी...जळगाव सिटी ग्रीन सिटी" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यशाळेत इ. ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. 'इको क्लब'चा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करणे, कचरा कमी करणे, प्लास्टिक टाळणे, ऊर्जा व पाणी बचत यासारख्या सवयी लावणे आहे.
इको क्लब मिशनचे समन्वयक श्री. सुनिल दाभाडे यांनी 600 ते 700 सीड्स बॉल तयार करत त्यात आंबा, पेरु, चिंच, नीम, सिताफळ, जांभुळ यांसारख्या स्थानिक फळझाडांच्या बिया वापरल्या.

या उपक्रमात सहभागी प्रत्येक झाडाजवळ संबंधित विद्यार्थ्याचे व त्यांच्या आईचे नाव व वर्ग नमूद करून पाटी लावण्यात आली आहे. हे झाड लावताना विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची जबाबदारी आणि पर्यावरणाबाबत आत्मीयता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी प्रमुख मुक्ता पाटील, मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे, सर्व शिक्षकवृंद व इको क्लबचे सदस्य उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी इको क्लब टीमचे विशेष अभिनंदन केले.



Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या