पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेशी सुसंगत अशी ‘डिजिटल मिशन’ ही अभिनव संकल्पना अमळनेर येथील रहिवासी तसेच ग्रोहो या संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन बिऱ्हाडे यांनी यशस्वीरीत्या अमलात आणली आहे. या संकल्पनेमुळे प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती, विविध शासकीय योजना व त्यांचे लाभ एकाच डिजिटल लिंकवर उपलब्ध होणार असून, त्यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शासनालाही महसूल प्राप्त होणार आहे. यामध्ये आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, जनगणना विभाग, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना थेट लाभ होणार आहे.
या डिजिटल मिशन अंतर्गत गावपातळीवरील मिळकत डिजिटायझेशन, क्यूआर कोडसह उताऱ्यांचे पुनरावलोकन, घर क्रमांक निर्धारण, जनगणना प्रक्रिया तसेच आरोग्य नोंद व्यवस्थापन हे सर्व एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनिक कामकाज अधिक जलद, सोपे आणि अचूक होणार आहे.
अमळनेरचा युवक डिजिटल क्षेत्रात अव्वल
या अभिनव प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रोहो संस्थेकडे १५० हून अधिक आयटी तज्ज्ञांची कुशल टीम कार्यरत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाला डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दिशेने ही टीम कार्य करत आहे.
या संकल्पनेचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विशेष कौतुक केले असून, “राज्यातील डिजिटल सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त, नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सचिन बिऱ्हाडे यांच्या या उपक्रमामुळे अमळनेरचा युवक डिजिटल भारताच्या वाटचालीत अग्रेसर ठरत असून, राज्यात नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला नवी दिशा मिळत आहे.
0 टिप्पण्या