मराठा सेवा संघाच्या 'मराठा जोडो अभियान' रथयात्रेचे अंमळनेरमध्ये जल्लोषात स्वागत


अंमळनेर (प्रतिनिधी) : गेल्या ३५ वर्षांपासून परिवर्तनवादी, प्रगतिशील आणि समतावादी विचारसरणी जपत मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर 'मराठा जोडो अभियान' राबविण्यात येत आहे. याच अभियानांतर्गत सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या रथयात्रेचे दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी अंमळनेर शहरात आगमन झाले. या वेळी शहरात रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.


ही रथयात्रा राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारसरणीवर चालत असून, समाजसुधारक महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी आणि समतावादी विचारधारेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे.


रथयात्रेचे अंमळनेर शहरात आगमन होताच स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्रेरी तर्फे अध्यक्ष मौलाना रियाज़ शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रथयात्रेतील मान्यवर कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विशेष म्हणजे या वेळी चहा-पाण्याची तसेच नागरिकांसाठी स्वागताची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात रथयात्रेतील मान्यवरांनी अंमळनेरकर नागरिकांशी संवाद साधत, सामाजिक ऐक्य, बंधुता, संविधानाचे भान, युवकांसाठी रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या, व्यसनमुक्ती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.


मराठा सेवा संघाच्या या रथयात्रेचे उद्दिष्ट जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक समता, सलोखा, ऐक्य आणि बंधुभाव वाढविणे हे असून, या यात्रेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक एकात्मतेचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे. अंमळनेरमध्ये देखील या रथयात्रेच्या निमित्ताने सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून सामाजिक सलोखा व ऐक्याची भावना व्यक्त केली.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मौलाना रियाज़ शेख, कलीम हाजी जलाल सेठ, जहुर मुतवल्ली, युसूफ पेंटर, हैदर मिस्री, हाजी सुपडु खाटीक, कुदरत अली,फारुख खाटीक सर, शाहरुख सिंगर, फारुख शेख उस्मान, मुख्तार फल्ली, मनोज मोरे, हिम्मत सोनवाने, सिकंदर पेंटर अकरम पठान, असलम बागवान,आबीद भाई बॅण्ड वाले,रज्जू बापू जवाई,फैजान शेख,अ. वाहेद भाई,रफिक भाई,धनराज पारधी, आप्पा दाभाडे, गोरख महाराज, बल्ली पवार,यांच्यासह स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. रथयात्रेच्या या स्वागताने अंमळनेर शहरात सामाजिक ऐक्य, बंधुता आणि माणुसकीचा सुंदर संदेश दिला गेला असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या