उत्रान येथे मोहरम सण उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

प्रतिनिधी | प्रकाश कुवर
 उत्रान (ता. एरंडोल) – उत्रान गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा मोहरम सण उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला गावातील सर्वच समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

परंपरेनुसार एका बांबूच्या काठीला हिरवा व गुलाबी कापड बांधून, त्यावर चांदीची चंद्रकोर आकाराची नाल बसवून पूजन करण्यात आले. कासार, भिल्ल, कुंभार, पाटील, कोळी, बौद्ध, मुस्लिम व हिंदू समाजाचे नागरिक एकत्र येऊन पीरबाबांच्या दर्ग्यावर सजवलेल्या शंभराच्या आसपास शिवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फेटे बांधून गावभर ही मिरवणूक वाजतगाजत निघाली.

या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी ढोल-ताशा मंडळाचे मालक फरीद शेख व जुबेर शेख यांचा सत्कार चिंदा दगडू कुंभार व समाधान कुंभार यांनी शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

सण शांततेत पार पडावा यासाठी सरपंच कविता महाजन, रजनीबाई धनगर, उपसरपंच हारून देशमुख, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले, दिनेश सोनवणे, योगेश महाजन, पोलीस पाटील राहुल महाजन, प्रदीप तिवारी यांसह गावातील अनेक मान्यवर, महिला वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत, पीएसआय रवींद्र पाटील, हवालदार नंदलाल परदेशी यांनी योग्य बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.
मोहरम निमित्त गावात सणासुदीचे व सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या